📅 15 Apr 2026
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात २३ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विभागात एकूण ८,६६९ नियमित पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून हा निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातील विद्यमान पदांचा सखोल आढावा घेण्यात आला. काही पदे रद्द करून १६५ नव्या पदांची निर्मिती करण्यात आली, ज्यामुळे एकूण मंजूर पदसंख्या ८,६६९ झाली आहे.
याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २,८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १,१०,६६४ अंगणवाडी सेविका आणि १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २,२१,३२८ मानधनाधारित पदे मंजूर करण्यात आली आहेत.
या भरतीमध्ये अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी (गट-ब) आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) (गट-ब) अशा विविध पदांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार असून विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ
https://missionshakti.wcd.gov.in/loginAs ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.